👉 मोबाईल नंबर प्रमाणे आता 'सेट टॉप बॉक्स पोर्टेबिलिटी'

मुंबई : मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीप्रमाणे आता 'डायरेक्ट टू होम' अर्थात 'डीटीएच' सेवाही बदलता येणार आहे. कारण आता ग्राहकांसाठी 'सेट टॉप बॉक्स पोर्टेबिलिटी'चा पर्याय खुला होणार आहे.

'टेलिकॉम नियंत्रण प्राधिकरण' अर्थात 'ट्राय'ने या संदर्भातील नियमावली तयार केली आहे. यामुळं 'डीटीएच' ग्राहकांना 'सेट टॉप बॉक्स'साठी वेगळे पैसे न मोजता त्यांच्या पसंतीच्या कंपनीची सेवा घेता येईल.

देशात २००३ मध्ये डीटीएच सेवा सुरू करण्यात आली. सध्या देशात सहा कंपन्या ही सेवा पुरवतात आणि या कंपन्यांचे सुमारे सात कोटी ३० लाख ग्राहक आहेत. यापैकी ज्या ग्राहकांना एका कंपनीची सेवा बंद करून दुसऱ्या कंपनीची सेवा घ्यायची आहे, अशा ग्राहकांना पुन्हा नवीन कंपनीला सेट टॉप बॉक्सचे पैसे भरावे लागत होते. यामुळेच ट्रायने या संदर्भात नवी नियमावली तयार केली आहे.

या नियमांनुसार ग्राहकांना आहे त्याच सेट टॉप बॉक्सवर नवीन कंपनीची सेवा घेता येणं शक्य होणार आहे. ग्राहकांनी केवळ इन्स्टॉलेशन आणि अ‍ॅक्टिवेशनचे पैसे भरायचे आहेत. याचबरोबर हे दर ४५० रुपयांपेक्षा जास्त नसावेत असंही ट्रायनं स्पष्ट केलं आहे.

याशिवाय वॉरंटीचा कालावधी संपल्यानंतर ग्राहकांच्या घरी जाऊन काही दुरुस्ती करावयाची असेल तर त्यासाठी आकारण्यात येणारे भेटीचे दर २५० रुपयांपेक्षा जास्त नसावे असंही नियमात स्पष्ट केलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत